लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी-चिंचवडकरांनो तुम्ही मूर्ख आहात का?

मुख्यमंत्री शिवसेनेचा अन् पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिक भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करताहेत कोणत्याच पदावर नसलेल्या किरीट सोमय्यांकडे.

पिंपरी ।लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे शहराच्या राजकारणात अनेक राजकीय गंमतीजमती घडताना दिसत आहेत. या राजकीय गंमतीजमती करताना काही राजकीय पक्ष पिंपरी-चिंचवडकरांना चक्क मूर्ख समजून प्रसिद्धी मिळवण्यासाठी फक्त स्टंटबाजी करत असल्याचे चित्र आहे. त्यातून पिंपरी-चिंचवडकर मूर्ख बनतील आणि महापालिकेची सत्ता आपल्याला देतील, असा या राजकारण्यांचा इरादा दिसत आहे. रविवारी (दि. १०) शिवसेनेने पिंपरी-चिंचवडकरांना असेच मूर्ख समजून एक आंदोलन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेला महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कोणी करावी? असा प्रश्न विचारला तर ते म्हणतील कोणत्याही पदावर नसलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी. बरं भ्रष्टाचार काय झाला?, कोणी केला?, भ्रष्टाचाराचे पैसे कोणाकडून कोणाच्या खात्यात जमा झाले? त्याचे पुरावे तरी पिंपरी-चिंचवडकरांना दाखवावे. तेही इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर केले जात नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनो आता तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे आणि ती म्हणजे आम्ही मूर्ख आहोत का?

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अवघा दीड ते दोन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारे भाजपला धडका देण्याचे काम करत आहे. पण या धडका एवढ्या जोरदार नाहीत की त्यामुळे भाजप विचलित होऊ शकेल किंवा जरा तरी इकडचे तिकडे हलेल. उलट या धडका मारून राष्ट्रवादी आणि शिवसेनाच हेलकावे खात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्ष म्हणून शहरवासीयांसाठी काय केले? याबाबत या दोन्ही पक्षाला काहीच सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. उलट या दोन्ही पक्षाचे नेते भाजपसोबत सेटलमेंट करण्यातच धन्यता मानतात, हे उघड राजकीय गुपित आहे. विरोधी पक्षाने जनतेसाठी काय केले पाहिजे?, जनतेच्या प्रश्नांवर कसा आवाज उठवावा?, भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यासह जनतेसमोर कसे मांडावेत?, हे राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने शिकण्याची खरी गरज आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना चमकोगिरी करून कायम प्रसिद्धीझोतात राहण्याचे व्यसन जडल्याचे चित्र आहे. त्यातून ना कोणता पुरावा, ना कोणता आधार फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला, अशी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची अवस्था झाली आहे.  

या सवयीतूनच आता या दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते पिंपरी-चिंचवडकरांना चक्क मूर्ख समजू लागल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना दररोज ओरडून ओरडून काहीही सांगितले की ते खरे वाटते, असे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला वाटू लागले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात अक्षरशः राजकीय गंमतीजमतीसाठी आणि स्टंटबाजीसाठी आंदोलने सुरू आहेत. असेच एक राजकीय गंमतीजमतीचे आंदोलन शिवसेनेने रविवारी केले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे रविवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी भाजपच्या पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी शहरातील शिवसेनेच्या मोजक्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवून गंमतीदार आंदोलन केले. करीट सोमय्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आमचे निवेदन स्वीकारावे, अशी येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख मागणी होती. पण सोमय्यांनी शिवसैनिकांकडे ढुंकूनही पाहिले नाही.

आता विषय हा आहे की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील महापालिका ज्या खात्याच्या अधिपत्याखाली येतात ते नगरविकास खाते सुद्धा शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांना आपलेच पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच विश्वास राहिला नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. कारण पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी खुद्द मुख्यमंत्र्यांनी न करता जी व्यक्ती कोणत्याच शासकीय पदावर नाही अशा किरीट सोमय्यांनी करावे, असे येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. यातच सर्व काही आले. राजकारणातील बौद्धिक दिवाळखोरीचा हा प्रकार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाला आहे, सुरू आहे, असे बेंबीच्या देटापासून ओरडणारी राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकही कागद जनतेसमोर मांडत नाही की ज्यातून नेमका भ्रष्टाचार काय झाला?, कोणी केला?, भ्रष्टाचाराचे पैसे कोणाकडून कोणाच्या खात्यात जमा झाले?, आमुक एक ठेकेदार, अधिकारी किंवा बिल्डरने भाजपचा कोणता नगरसेवक, पदाधिकारी किंवा कार्यकर्ता यांच्या खात्यात पैसे पाठवले? हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पिंपरी-चिंचवडच्या जनतेसमोर आजपर्यंत मांडता आलेले नाही. तरीही भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, असे फक्त ओरडत राहायचे आणि त्याची दखल घेणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांमधून प्रकाशझोतात राहायचे, असा डाव राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मांडलेला दिसत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनो आता तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे आणि ती म्हणजे आम्ही मूर्ख आहोत का? आणि असं आणखी किती वर्ष आम्हाला मूर्ख समजणार आहात?

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani