पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार
-मात्र 11 गावांच्या विकासाला मुहूर्त कधी लागणार ?
पुणे | लोकवार्ता-
पुणे महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार झाला आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. मात्र 2017 मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा अद्यापही पूर्ण झाला नसल्याचे समोर आले आहे. या 11 गावांच्या विकासाला मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत नव्याने सामाविष्ट झालेल्या 23 गावांना विकासकामे सुरु न झाल्याचं कारण देत कर सवलत ही नुकतीच देण्यात आली आहे. त्यानंतर आता गावांच्या नियोजनात्मक विकास सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेट समाविष्ट झालेल्या 11 विकासाचा मुहूर्त कधी साधणार याकडे लक्ष लागले आहे.

महानगरपालिकेच्या हद्दीत २०१७मध्ये ११ गावांचा समावेश झाला. यामध्ये लोहगाव (उर्वरित), उर्वरित हडपसर- साडेसतरा नळी, मुंढवा, केशवनगर, उंड्री, आंबेगाव खुर्द, बुद्रुक, शिवणे, शिवणे-उत्तमनगर, धायरी (काही भाग), उरुळी देवाची आणि फुरसुंगी पूर्ण या गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जवळपास वर्षभराने पुणे महापालिकेने ऑक्टोबर 2018 मध्ये या गावांसाठी विकास आराखडा जाहीर करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे विकास आराखड्याचे काम बारगळले ते आद्यपही सुरु झालेले नाही. सद्यस्थितीला महापालिकेने आराखड्याच्या कामासाठी 22 जून 2022 पर्यंतची मुदत दिली आहे.