दापोडी येथील नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्प रद्द
‘एसआरए रद्द’ निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले
पिंपरी। लोकवार्ता-
दापोडीतील जय भीमनगर, सिद्धार्थ, गुलाबनगर, लिंबोरी वस्ती, महात्मा फुलेनगर परिसरात ‘एसआरए’ प्रकल्प राबविण्याचे नियोजन होते. त्याला बाधितांचा तीव्र विरोध होता. स्थानिक पातळीवर विविध पक्षांच्या संघटनांनी याविरोधात आवाज उठविला. त्या अनुषंगाने पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर मोर्चा नेण्यात आला होता. प्रकल्प राबविणारच अशी चर्चा सुरू झाल्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. त्यांच्याशी संवाद साधला जाईल, असे आश्वासन ‘एसआरए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.दापोडी येथील नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. या निर्णयाचे स्थानिक पातळीवर स्वागत करण्यात आले.
प्रकल्पाच्या विरोधासाठी ‘दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समिती’ स्थापन करण्यात आली होती. त्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेच्या माध्यमातून प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी कृती समितीचे समन्वयक राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली दापोडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आनंदोत्सव साजरा केला. माजी नगरसेवक सनी ओव्हाळ, रमा ओव्हाळ, विनय शिंदे, गोपाळ मोरे, वैष्णाराम चौधरी, संजय भिंगारदिवे या वेळी उपस्थित होते.
हा नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे. प्रशासनाने नागरी हिताचे प्रकल्प राबविताना कायद्याचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे दिसून येत नव्हते. स्थानिक नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून ठेकेदारांना फायदेशीर ठरेल, अशा प्रकारची वाटचाल होती. त्या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे निर्णय रद्द करणे भाग पडले. – श्रीरंग बारणे, खासदार