अजितदादांनी फिल्डिंग लावूनही मत न फुटल्याने भाजप नेत्यांचा आनंद द्विगुणित
भाजपला मिळाल स्पष्ट बहुमत.
पिंपरी | लोकवार्ता-
पीएमआरडीएच्या महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. कॉंग्रेसमुळे मोठ्या नागरी मतदारसंघातील (म्हणजे पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका क्षेत्रातील २२ जागांची) निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यांनी आपला उमेदवार उभा केला. परिणामी २२ जागांसाठी २३ उमेदवार असल्याने तेथे बुधवारी मतदान घ्यावे लागले. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. त्यात भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले. त्यांनी एकूण ३० जागांपैकी १६ जागा जिंकल्या. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस १२ मिळवून दुसऱ्या स्थानी राहिली आहे. शिवसेना आणि अपक्षांनी एकेक जागा पटकावली. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात भाजपने बाजी मारली असून ग्रामीण भागात राष्ट्रवादी वरचढ राहिली. महापालिका क्षेत्रातील २२ पैकी १४ जागा भाजपने पटकावल्या. तर, राष्ट्रवादीने सात जिंकल्या. तर, एक जागा शिवसेनेला मिळाली.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपाने केलेल्या विकासाला आगामी महापालिका निवडणुकीत निश्चितच सामान्य जनता साथ देईल, असा विश्वास या निकालाने दिला, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली. भाजपाचे सर्व नगरसेवक एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपा निर्विवाद विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.