पॉलिटिक्स विथ रिसपेक्ट ; जयंत पाटलांनी घेतली आमदार लांडगेंची भेट
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजप अध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे ( वय ६५ वर्षे, रा. भोसरी) यांचे नुकतेच (ता.२४ सप्टेबर) अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यानंतर त्यांच्यासह कुटुंबियांच्या सांत्वनासाठी भोसरीतील त्यांच्या निवास्थानी राज्यभरातून सर्वच पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. राजकारण करण्याची आमदार लांडगेंची पद्धत जरा वेगळी आहे. ते पॉलिटिक्स विथ रिसपेक्ट
ने ते करतात. त्यामुळेच त्यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या घरी पक्षभेद,मतभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची राज्यभरातून सांत्वनासाठी रांग लागली आहे. गेले चार दिवस ती कायम आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेचच आपल्या या आवडत्या पैलवान आमदाराला भेटून गेले. त्यानंतर भाजपच्या इतर नेतेमंडळीची रांग लागली. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांत्वन करून गेले. यावेळी विधान परिषद सदस्या उमा खापरे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,प्रदेश सचिव अमित गोरखे,शहर सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे आदी हजर होते.भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि फायरब्रॅण्ड नेत्या चित्रा वाघ या सुद्धा काल लांडगेंना भेटून गेल्या. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनीही लांडगेंची भोसरी निवासस्थानी काल त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.