प्रभागरचनेत पुन्हा बदल होण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : ‘महाविकास आघाडीत प्रभाग रचनेवरून काही वाद होणार नाही. समन्वयाने त्यातून मार्ग काढू. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर समन्वयाने प्रभाग रचनेबाबत निर्णय घेऊ, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. राज्य सरकारने मुंबई वगळता इतर महापालिकेत तीन प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पवार म्हणाले, ‘आमच्या सहकारी पक्षातील काहींनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर वेगळ्या प्रकारचे मत व्यक्त केले आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने एखाद्या विषयाच्या संदर्भात समन्वय साधून, सर्वमान्य तोडगा काढावा लागतो. ज्यांना न्यायालयात जायचे ते जाऊ शकतात. यावर येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल.’
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणूका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे, त्यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘निवडणूक आयोग त्यांचे काम करीत आहे. ती स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्यांचे ते भूमिका घेऊ शकतात. रचनेबाबत कोणताही वाद होणार नाही. ज्यांना न्यायालयात जायचे ते जाऊ शकतात.
त्यांना कडक शासन केले पाहिजे….
शक्ती कायदा करताना महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई-वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते, याकडे लक्ष दिले पाहिजे. ७० ते ७५ टक्के घटना या जवळच्या लोकांकडून घडतात. त्यांना एवढे कडक शासन केले पाहिजे की ते बघितल्यावर कुणाच्या मनात तसे करण्याची हिमत व्हायला नको, फअशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.
मला त्यावर काही म्हणायचे नाही…
भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांच्याबाबत पहिल्या दिवशी जे घडले ते चुकीचे घडले. कुणाला काही पाहणी करायची असेल, तर ती करू द्यावी, असेही पवार म्हणाले. पवार यांच्यावरही त्यांनी काही आरोप केले आहेत, त्याबाबत कुणी माझे नाव घेत असेल, तर त्याला मी काय करू. त्यांनी पुण्यात येऊन माझे नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या. मला त्यावर काही म्हणायचे नाही, असे ते म्हणाले.
रिंगरोडचे भूसंपादन लवकरच…
पुणे शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रिंगरोडचे लवकर भूसंपादन करण्यात येणार आहे. पश्चिम पट्ट्यातील रिंगरोडची मोजणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन करून द्या, मी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातील मुख्यमंत्र्त्यांशी चर्चा करून पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.