यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोविडनंतरचे पुनर्वसन केंद्र सुरु
महापालिकेने तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टची नेमणूक केली

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : मागील १ वर्षापासून कोविड आजार साथ सुरु आहे. अनेक कोविड रुग्ण, कोविड बरा झाल्यानंतरही अशक्तपणा, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दम लागणे यामुळे त्रस्त आहेत. त्यांचे पुनर्वसन करुन त्याची शारीरिक क्षमता तसेच दैनदिन जीवनशैली सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषगाने पिपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोविडनंतरचे पुनर्वसन केंद्र (पोस्टकोविड रिहॅबिलिटेशन सेंटर) सुरु करण्यात आले आहे. मंगळवारपासून केंद्र रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रामध्ये यासाठी अद्ययावत उपकरणे उपलब्ध केली आहेत.

कोविड बरे झालेले पण कार्यक्षमता कमी झालेल्या रुग्णांना येथे भौतिकोपचार तज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट) उपकरणांच्या सहाय्याने योग्य व्यायाम शिकवतील. वेळोवेळी रुग्ण सुधारणेबाबत दखल घेतील. या पुनर्वसन केंद्रामध्ये आवश्यक उपकरणे उपलब्ध करण्यासाठी महापालिका व सिप्ला फांऊडेशनने पुढाकार घेतला.
तसेच महापालिकेने तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टची नेमणूक केली. केंद्र सुरु करण्याकामी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, सिप्ला फांऊडेशनचे प्रमुख अनुराग मिश्रा, डॉ. क्रांती रायमाने, उरोरोग विभागप्रमुख, भौतिकोपचार विभागप्रमुख यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला.