प्रसाद सस्ते, संकेत चव्हाण यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड
लोकवार्ता : चुरशीच्या लढतीत आकुर्डीचा कुस्तीपटू संकेत चव्हाण याने माती विभागात भोसरीच्या समाधान दगडे याच्यावर ३ विरुद्ध २ अशा गुणफरकाने आघाडी मिळवत महाराष्ट्र केसरीसाठी पिंपरी-चिंचवड निवड चाचणी स्पर्धेत स्थान निश्चित केले, तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात प्रसाद सस्ते (मोशी) याने शेखर शिंदे याच्यावर एकतर्फी बाजी मारली. पुनावळे येथे शनिवारी रात्री ही स्पर्धा पार पडली.

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने वस्ताद आनंदराव बाजीराव बोरगे (पाटील) यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू व आंतरराष्ट्रीय पहिलवान रत्नेश रोहिदास बोरगे स्पोर्टस् फाउंडेशनने स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्घाटन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले यांच्या हस्ते झाले.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते विजेत्या पहिलवानांचा चषक, प्रशस्तीपत्रक, ट्रैक सूट देऊन सन्मान झाला. यावेळी वस्ताद भगवानराव काटे, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी काळोखे, संभाजी राक्षे, संदेश काकडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू वस्ताद शंकर कंधारे, हिंदकेसरी अमोल बराटे, भारत केसरी विजय गावडे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, किशोर नखाते, भरत लिम्हन, अभिषेक फुगे, अजय लांडगे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, मयूर कलाटे, शेखर ओव्हळ व मावळ केसरी नागेश राक्षे, खंडू वाळुंज उपस्थित होते. पंच म्हणून पप्पू कालेकर, संजय दाभाडे, विजय कुटे, धोंडिबा पाबळे, बाळासाहेब काळजे, ज्ञानेश्वरी लोखंडे, नीलेश मारणे, विक्रम पवळे, भानुदास घारे, अमित म्हस्के, सचिन खांदवे यांनी काम पाहिले.
अंतिम लढतीत संकेत व समाधान दोघेही तुल्यबळ होते. माध्यान्हापर्यंत २-२ अशी आघाडी असलेल्या संकेतला समाधानने लढत दिली. संकेतने अखेरच्या मिनिटात चपळाईने दुहेरी पट काढून आणखी दोन गुण मिळवले. प्रसाद सस्ते याने चपळ खेळी करीत आघाडी घेतली. त्यास शेखर शिदे याने कडवी झुंज दिली. मात्र, अखेरीस प्रसादने विजय मिळवला.