पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक खेळाडूंचा उंचावला आत्मविश्वास
तुम्ही आहात खऱ्या आयुष्यातील चॅम्पियन!

लोकवार्ता । प्रतिनिधी
‘कोणतेही मानसिक ओझे न घेता आपली सर्वोत्तम कामगिरी करा. नव्या विचाराचा भारत खेळाडूंवर पदक मिळविण्यासाठी दबाव आणत नाही. तुम्ही खन्या आयुष्यातील चॅम्पियन आहात, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो पैरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला.
ऑलिम्पिक स्पर्धेच्याआधीही मोदी यांनी भारतीय खेळाडूंशी संवाद साधताना त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता त्यांनी पॅरालिम्पियन खेळाडूंशी संवाद साधून २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या खेळाडूंचा उत्साह वाढविला. मंगळवारी मोदी यांनी दिव्यांग खेळाडूंशी सुमारे दीड तास संवाद साधत त्यांच्या आयुष्यातील आव्हानांविषयी जाणून घेतले.
ऑनलाइन पद्धतीने खेळाडूंशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, “तुम्ही खरे चॅम्पियन आहात. तुम्ही आयुष्याच्या खेळामध्ये संकटांना नमविले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना महामारीदरम्यानही तुम्ही तुमचा सराव थांबविला नाही. एक खेळाडू म्हणून पदक मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र नव्या विचाराचा आजचा भारत खेळाडूंवर पदकासाठी दबाव आणत नाही. त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय मोकळेपणाने खेळा आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करा. तिरंगा घेऊन तुम्ही सर्वोत्तम खेळ केला, तर केवळ पदक नाही जिंकणार, तर नव्या भारताच्या विचारांना नवी ऊर्जाही द्याल.