पुणे जिल्हा माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पर्यावरणदिनी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्याचा गौरव केला गेला.

लोकवार्ता|प्रतिनिधी
पुणे : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्ह्याने बाजी मारली आहे. या अभियानात पुणे जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पर्यावरणदिनी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्याचा गौरव केला गेला.
मागील वर्षी महात्मा गांधी जयंतीदिनापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत पुणे जिल्ह्यातील १४ नगरपालिका क्षेत्रांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबावी, या उद्देशाने हे अभियान सुरु केले आहे.
यानुसार पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती कशी अवलंबावी, याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या पंचतत्वांपैकी पृथ्वी तत्त्वानुसार वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरणावर भर देण्यात आला.
वायू तत्त्वांनुसार वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. जलतत्त्वांनुसार नदी संवर्धन, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करणे, अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्यास प्रोत्साहन देणे आणि अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आदींचा अवलंब केला.
या अभियानांतर्गत महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीचे बांध यांसारख्या जागेचा पुरेपुर वापर करण्यात आला. आकाश तत्त्वानुसार स्थळ व प्रकाश या स्वरूपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे सर्वसामान्यांमध्ये बिंबविण्याचे काम करण्यात आले.