Pune News : अनलॉकचे नियम बदलले
पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊन लागू…

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली असताना महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली होती. परंतु, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटने डोकं वर काढल्याने राज्य सरकारतर्फे नवे निर्बंध लागू करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात सोमवारपासून नवी नियमावली लागू होत असल्याची घोषणा केली आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानंही आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत आणि अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त असलेल्या आस्थापना या सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमवारपासून पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ही सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्या व्यतिरिक्त लोकलमधून फक्त सरकारी कर्मचारी व वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. सामाजिक धार्मिक कार्यक्रम हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहणार आहे.
कृषी मालाशी निगडित असलेल्या आस्थापना या आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. जिम सलून व ब्युटी पार्लर हे ५०% क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवता येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रांमधील मॉल्स, थिएटर्स ही पूर्णपणे बंद राहणार आहेत. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. या बरोबरच दुपारी ४ नंतर तसेच शनिवार आणि रविवार फक्त पार्सल आणि घरपोच सेवा देण्यास रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेची वाहतूक व्यवस्था व खासगी वाहनाने प्रवास करण्यास सामान्य लोकांना परवानगी असणार आहे. खासगी कार्यालय ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. पूर्वीप्रमाणेच पुण्यात पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचं दिसून येत आहे.