पुणेकरांची व पिंपरी चिंचडकरांची मेट्रोची हौस भागली
-सुरुवातीला प्रतिसाद मात्र आता प्रवाश्यांची पाठफिरवणी.
पिंपरी । लोकवार्ता-
महिनाभरापूर्वीच पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले होते. पुणेकरांनी व पिंपरी-चिंचवडकरांनी पहिल्याच दिवशी मेट्रोला उत्तम प्रतिसाद दिला होता ; मात्र सध्या मेट्रोकडे सर्व प्रवाश्यांची पाठ फिरवली आहे. पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोत प्रवासी खूप कमी होते. त्यामुळे शहरवासीयांची मेट्रोची हौस भागल्याचे चित्र आता आहे.
नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवण्यासाठी तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि जलद गतीने व्हावा, यासाठी मेट्रोची सुरुवात करण्यात आली; मात्र कामे अपूर्ण असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली गेली . अवघ्या महिनाभराच्या कालावधीतच मेट्रोच्या प्रवाशांत तब्बल ९० टक्क्यांनी घट झाली आहे. फक्त शनिवार, रविवार गर्दी होतेय. १३ मार्चला ६७ हजारांपर्यंत गेलेला प्रवाशांचा आकडा एक महिन्यानंतर अवघा २-३ हजारांवर आला आहे, ही परिस्थिती अशीच राहिली तर मेट्रो सेवा तात्पुरती बंद करावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पिंपरी – चिचवड शहरात पिपरी स्थानक ते फुगेवाडी दरम्यान सध्या मेट्रो धावते. सोमवारी दुपारी १२.०५ मिनिटांनी पिपरी स्थानकांवरून सुटलेल्या मेट्रोत अवघे ३५-३७ प्रवासी होते. तीच मेट्रो फुगेवाडी स्थानकांवरून परतली तेव्हा त्यात फक्त १५-१७ प्रवासी होते. उद्घाटनावेळी गाजावाजा केलेल्या इ – रिक्षा आणि सायकली पडून आहेत. स्थानकाबाहेरच बाइक आणि सायकल दिसत आहेत. मात्र त्या कार्यान्वित नाहीत. पहिल्या दिवसापासून बाइक, सायकली धूळ खात आहेत.