पुण्यातील ढोल-ताशा पथकाला ६० जणांना हैदराबादमध्ये ठेवलं डांबून !
१५ सप्टेंबर रोजी स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ढोल पथक पुण्यातून हैदराबादला गेलं होतं

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुण्यातील ढोल-ताशा पथक गणपतीसमोर ढोल ताशा वाजवण्यासाठी सुपारी घेऊन हैदराबादला गेलेल्या एका पथकाला स्थानिकांनी डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या पथकात १६ मुलींसह ६० जणांचा समावेश आहे. ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्याने आणि जास्त दिवस वादन करायला लावल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या घटनेची माहिती पुण्यातील मनसेच्या नगरसेविकेला मिळल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील नगरसेवकाच्या मदतीने संबंधित पथकाची सुटका केली आहे. शनिवारी सायंकाळी हे पथक पुण्याकडे रवाना झालं आहे.
याबाबत माहिती देताना, स्वामी ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शुभंकर वायचळ यांनी सांगितलं की, एका इव्हेंट कंपनीच्या प्रेमानंद यादव यांनी हैदराबाद येथील सिकंदराबाद परिसरात ढोल-ताशा वादनासाठी ४ लाखांची सुपारी दिली होती. त्यानुसार, १५ सप्टेंबर रोजी स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील १६ मुलींसह ६० जणांचं पथक पुण्यातून हैदराबादला गेलं होतं. १६ सप्टेंबरला हैदराबादला पोहोचल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे सिकंदराबाद येथे १६ ते १९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गावांत गणपतीसमोर वादनाचं काम केले.
पण आयोजकांनी आणखी ३ दिवस वादन करण्याची गळ घातली. त्यानुसार पुण्यातील ढोल पथकाने आणखी तीन दिवस वेगवेगळ्या गावात वादनाच काम केलं. पण त्याठिकाणी पंधरा दिवस गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे स्थानिक आयोजकांनी ढोल ताशा पथकाच्या चालकाकडून परमिटची फाइल हिसकावून घेतली. तसेच आणखी तीन दिवस वादन करा, त्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी दिली.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर स्थानिक आयोजकांनी ढोल ताशा पथकातील मुलींना देखील शिवीगाळ केली. शुक्रवारी रात्री आयोजकांसोबत भांडण झाल्यानंतरही त्यांनी ते पथकाला सोडायला तयार नव्हते. शेवटी पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे, तसेच नितीन परदेशी यांच्यासह अनेकांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर हैदराबाद येथील नगरसेविका पुजारी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी ही बाब पोलीस उपायुक्तांच्या कानावर घातली. त्यानुसार हैदराबाद पोलिसांनी ढोल ताशा पथकाला मदत करत आयोजकांकडून २ लाख रुपये मिळवून दिले.