बारामती-फलटण-लोणंद आणि पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे काम आता मार्गी लागणार

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बारामती-फलटण-लोणंद आणि पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे काम आता मार्गी लागणार असून एका महिन्याच्या कालावधीत १०० एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. त्यामुळे आता लोहमार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. बारामती-फलटण-लोणंद अशी नवीन एकेरी रेल्वे मार्गाची एकूण ६३. किमी लांबी असून ३७. किमी रेल्वेमार्ग हा बारामती तालुक्यातून जात आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आता बारामती तालुक्यातील १२ गावांमधील खाजगी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
या सर्व गावातील जमिनीचे दर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ‘दर निश्चिती समिती’ने निश्चित केले आहेत. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बन्हाणपूर, नेतपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कन्हावागज, सावंतवाडी व तांदुळवाडी या 12 गावामधील खासगी जमिनीचे भूसंपादन होणार आहे. या जमिनेचे संपादन करत असताना जमिनीचे दर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दर निश्चिती समितीने निश्चित करण्यात आले आहेत. जमीन खरेदीसाठी प्राप्त 115 कोटी रुपये निधीपैकी १०० कोटी रुपये खर्च झाले असून पुढील खरेदी प्रक्रियेसाठी निधी मागणी प्रस्ताव दाखल केला आहे. सर्व खासगी जमिनीची खरेदी प्रक्रिया जून 2022 अखेर पूर्ण करण्याचे प्रशासनाने प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.