अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीवर राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण
-पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना दिले स्पष्टीकरण
पुणे। लोकवार्ता-
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुध्या दौऱ्याचा झालेल्या विरोधावर बृजभूषण सिंग यांच्या वर खोचक टीका करण्यात आली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की,अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीवर राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण दिले आहे .राज ठाकरे म्हणाले की, माझं पायाचं दुखणं सुरु आहे. त्यामुळं कमरेलाही त्रास होतोय. दुखणं वाढलं असल्यानं एक तारखेला शस्त्रक्रिया करतोय, असं त्यांनी सांगितलं.