भा.विं.चे जीवनकार्य म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत- आयुक्त राजेश पाटील
पिंपरी | लोकवार्ता-
कै.भा.वि.कांबळे यांचे जीवन म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत आहे.शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी भरीव योगदान दिले.त्यांचे जीवनकार्य सर्वांसाठीच एक आदर्श आहे ‘ असे प्रतिपादन महापालिका आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी केले.

कै.भा.वि.कांबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.महापालिका भवनातील कै.भा.वि. कांबळे पत्रकार कक्षात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,माजी उपमहापौर केशव घोळवे,कामगार नेते यशवंत भोसले, नगसेवक कुंदन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, स्वानंद राजपाठक, अहमद खान, राजेंद्र जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात करताना जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांनी भा.वि. कांबळे यांनी या शहरात कशा प्रकारे पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली हे सांगतानाच काही आठवणीही सांगितल्या. जेष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांनी भा.वि.कांबळे म्हणजे पत्रकारीतेचे चालते बोलत विद्यापीठ होते. केवळ पत्रकारीताच नव्हे तर नाट्य-चित्रपट, साहित्य या क्षेत्रातही योगदान दिल्याची आठवण सांगितली.
यावेळी बोलताना ढाके म्हणाले की , ‘ भा.वि.कांबळे यांनी कार्यकर्त्यांना उभे करण्याचे काम केले आहे. मी कामगार नेता म्हणुन काम करीत असताना टेल्कोचा संप सुरू होता.त्यावेळी पवना समाचारने कामगारांसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांची पत्रकारीता मी अगदी जवळून पाहिली आहे.आजच्या काळात त्या पत्रकारीतेचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे.
खाडे म्हणाले की, ‘ या शहराच्या जडणघडणीत आणि विकासात भा.वि. कांबळे आणि पवना समाचारचा खूप मोठा वाटा आहे. सामान्य कार्यकर्त्यांचेही नाव भा. वि.कांबळे नेहमी बातमीत टाकत असत.हे त्यांचे खास वैशिष्ठ होते.
कामगार नेते यशवंत भोसले यांनी सांगितले की, ‘ पवना समाचार परिवाराशी माझे संबंध ३५ वर्षांहून जुने आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या कार्याची दखल कोणीतरी घ्यावी असे कायम वाटत असे. या शहरात त्यावेळी मोजकीच वृत्तपत्रे येत असत. परंतू येथील बातम्यांना या वृत्तपत्रांमध्ये विशेष स्थान मिळत नसे.आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी पवना समाचार आणि भा.वि. कांबळे हाच मोठा आधार होता

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी यावेळी बोलताना शहराच्या जडणघडणीमध्ये भा.वि.कांबळे यांनी दिलेल्या योगदानावर दृष्टीक्षेप टाकला. महापालिकेच्या विकास कामांबाबात अधिकारी, नगरसदस्य हेही त्यांचा सल्ला घेत होते.तसेच त्यांच्या सल्लाने शहरात अनेक प्रकल्प उभे राहिल्याचेही सांगितले.
पवना समाचारचे संपादक अरूण कांबळे यांनीही काही आठवणी सांगितल्या.तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे पवना समाचार परिवारातर्फे आभार मानले. पिंपरी- चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी पत्रकार संघातर्फे भा.वि.कांबळे यांना अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले.