आज रायगडावर हजारो शिवभक्तांच्या गर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पडला पार ; shivrajyabhishek sohala 2022
आज रायगडावर हजारो शिवभक्तांच्या गर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे राज्याभिषेक सोहळा कमी गर्दीने करण्यात आला होता. यंदा मात्र मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला.

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवराई सुवर्ण नाण्यांच्या प्रतिकृतींचा अभिषेक होताच शिवछत्रपतींच्या जयघोषात गड दुमदुमला. होळीच्या माळावर शिवभक्तांनी ताल धरला. फुलांच्या आणि भंडार्याची उधळण करत शिवभक्तांनी महाराजांचा जयजयकार केला.
३५० वर्ष होऊनही महाराजांचा राज्याभिषेक अगदी राजेशाही थाटात हजारो शिवभक्त दरवर्षी साजरा करतात. जिल्हा परिषदेच्या शेडमधून फुलांनी सजलेली शिवछत्रपतींची पालखी होळीच्या माळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हातात तलवार, भाला, तीर कमान, विटा घेऊन रणमर्द शिलेदार पालखी सोहळ्यात सहभागी झाले. नगारखान्यातून पालखीने राजदरबारात प्रवेश करताच शिवभक्तांच्या नजरा पालखीकडे वळल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणला.संभाजीराजे व शहाजीराजे यांचे याचवेळी आगमन झाले आणि शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर जलाभिषेक व दुग्धाभिषेक झाल्यानंतर संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनांचा अभिषेक घालण्यात झाला.गडावरील विठ्ठल औकिरकर कुटुंबियांनी वंश परंपरेने जपलेले शिवराई सुवर्ण होन गतवर्षी संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्या नाण्याच्या प्रतिकृतींनी अभिषेक घालण्यात आला.