“घाट दुरुस्ती साठी आयुक्त व महापौरांना निवेदन”
“बैलगाडा शर्यत घाट तात्काळ दुरुस्त करा” समस्त बैलगाडा प्रेमींची मागणी.
पिंपरी | लोकवार्ता-
गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला बैलगाडा शर्यत बंदीचा निकाल आज लागला असून बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी देण्यात आल्याने गेल्या सात वर्षांपासूनचा शेतकरी संघटनांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. काल लागलेल्या या निकालानंतर हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा अर्थात शेतकऱ्याला जीव लावणाऱ्या बैलजोडींचा आहे, अशा प्रतिक्रिया बैलगाडा प्रेमींमधून येऊ लागल्या आहेत. बैलगाडा प्रेमींनी मोठ्या जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे समस्त बैलगाडा प्रेमींच्या वतीने आज महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाविष्ट गावांतील बैलगाडा शर्यत घाट तात्काळ दुरुस्ती करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत काल दि. १६ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून अॅड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे राधाकृष्ण टाकळीकर यांनी दिली. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील माजी उपमहापौर राहुल जाधव यांनीही घाट दुरुस्ती साठी पिंपरी चिंचवड चे आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना निवेदन केले.

यावेळी माजी महापौर राहुल जाधव,माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,माजी नगरसेवक शांताराम भालेकर,उद्योजक निखिल बोऱ्हाडे,प्रसिद्ध गाडा मालक राहुल सस्ते,गोट्या फुले ,अजित बुर्डे, विनायक मोरे,अजित गायकवाड, अभिजित तिकोने, तुषार सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.