पत्रकार राजेंद्र लक्ष्मण येवलेकर यांची आत्महत्या
पिंपरी/लोकवार्ता-
पुणे शहरातील ज्येष्ठ पत्रकार व ‘लोकसत्ता’चे मुख्य उपसंपादक राजेंद्र लक्ष्मण येवलेकर (वय 53) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राजेंद्र येवलेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि चार भाऊ असा परिवार आहे.
राजेंद्र येवलेकर यांनी नाशिक शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली होती. त्यानंतर मागील सव्वीस वर्षांपासून ते पुण्यात कार्यरत होते. लोकसत्ता वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात त्यांनी अनेक वर्षे संपादनाचे काम केले. त्यांच्या या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेंद्र येवलेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटसह इतरही महाविद्यालयात पत्रकारिता विषयाचे अध्यापन कार्य केले होते.याशिवाय त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर भरपूर लेखनही केले आहे.

दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.