सदनिकेवर करआकारणी करण्यासाठी मालमत्तेची नोंदणी करताना ट्रान्फर फी म्हणून आकारण्यात येणाऱ्या रक्कमेबाबतचा अन्यायकारक आदेश रद्द करा – संजीवन सांगडे
लोकवार्ता : एप्रिल 2022 पासून सदनिकेवर करआकारणी करण्यासठी मालमत्तेची नोंदणी करताना ट्रान्फर फी ( नोंदणी फी ) म्हणून आकारण्यात येणाऱ्या मालमत्तेच्या खरेदी किंमतीच्या 0.5% घेण्यात येणार असल्याचा आदेश महानगरपालिकेकडून काढण्यात आला आहे. हा आदेश रद्द करण्यात यावा असं आवाहन चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने केली आहे.

प्रशासकीय राजवट चालू झाल्यापासून एप्रिल 2022 मध्ये एक निर्णय घेऊन, मालमत्तेची आपल्या करसंकलन विभागात नोंदणी करून कर आकारणी करताना जी फी, ज्याला ट्रान्फर फी म्हटले आहे ती पूर्वीचा नियम बदलून आपण मालमत्तेच्या खरेदी किमतीच्या 0.5 %एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्णय केला आहे. ही आमच्या सदनिकाधारकांच्यावर अन्याय करणारी बाब आहे. पूर्वी ट्रान्स्फर फी, नोंदणी फी म्हणून सामान्य कराच्या 10% एवढी रक्कम घेतली जात होती, हा जो नियम होता तो अचानक बदलून आपण मालमत्ता खरेदीच्या 0.5% घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो आम्हाला समजण्यापलीकडील आहे.
अशा प्रकारची मनमानी करून आपण सदनिकाधारकांना आर्थिकदृष्ट्या नाहक त्रास देत आहात. तसेच ज्यावेळी विकसकाकडून आमचा सदनिकाधारक सदनिका खरेदी करतो आणि त्याची नोंदणी आपल्या करसंकलन विभागात कर आकारणी करण्यासाठी करतो त्यावेळी मालमत्तेची प्रथम नोंदणी करण्याची जबाबदारी पूर्णपणे विकासकाची असते, काही कारणास्तव जर विकसक ती करत नसेल व आमचे सदनिकाधारक करत असतील तर ही मालमत्तेची प्रथम नोंदणी असल्याने त्यावर ट्रान्स्फर फी घेऊ नये. कारण ही खरेदी नंतरची पहिलीच नोंदणी असते. तरीदेखील आपण या नवीन नियमात यांच्याकडून देखील मालमत्ता खरेदीच्या 0.5% नोंदणी फी घेत आहात. चुकीचे व अन्याकारक आहे. हा नवीन नियम तयार करून मालमत्ता खरेदीच्या 0.5% रक्कम नोंदणी फी म्हणून घेत आहात. ते बंद करून पूर्वी प्रमाणेच मालमत्तेची करआकारणी करण्यासाठी नोंदणी करताना सामान्य कराच्या 10 % एवढी रक्कम अकरावी. तसेच मालमत्तेची करआकारणीसाठी प्रथमच नोंदणी होणार असेल तर ती निशुल्क करावी, अशी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे.