पाणी पुरवठा सक्षमीकरणासाठी दिघीत रायजिंगमेन काम सुरू!
– भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती.
पिंपरी | लोकवार्ता-
प्रभागातील दिघीसाठी भोसरी पंप ते दिघीपर्यंत नवीन रायजिंगमेन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, कुलदीप परांडे, संजय गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक चार दिघीसाठी भोसरी संप ते दिघी संपपर्यंत नवीन रायजिंगमेन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. भोसरी संपवरून दिघी दत्तगडाकडे येणारी पाण्याची पाईप लाईन ही ४०० मिलीमीटर व्यासाची होती. त्यामुळे एक टाकी भरण्यासाठी सुमारे पाच तास लागत आहेत. टाकी खाली होण्यासाठी एक तास लागतो. पाण्याची टाकी दिवसातून चार वेळा भरली तरी दिवसाचे २० तास टाकी भरण्यासाठी जातात. परिणामी, टाकीतून पाणीपुरवठा न करता ममता चौकातून डायरेक्ट बायपास सिस्टीमद्वारे सध्या पाणीपुरवठा होत आहे.

इ-प्रभागातील दिघी हा अतिशय दाट लोकवस्तीचा व पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारा मुख्य दुवा आहे. दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही सध्या दिघीत २४ तास पाणीपुरवठा करावा लागत आहे. काही भागाला रात्रीचा पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना रात्री जागून पाणी भरावे लागते.

नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ६०० मिलीमीटर व्यासाची लोखंडी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर दिघी दत्तगडावरील पाण्याच्या टाक्या दोन ते अडीच तासात भरतील. यामुळे संपूर्ण दिघीला गडावरील टाकीतून चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे. यासाठी सुमारे सव्वासहा कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती नगरसेवक विकास डोळस यांनी दिली.