…संघात निवड झाल्याने ऋतुराज गायकवाडच्या सातत्य आणि मेहनतीचे चीज झाले
ऋतुराज गायकवाडने जवळपास बारा वर्षे कसून सराव केला

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात जुलैमध्ये तीन एकदिवसीय व तीन T20 सामने खेळवले जाणार आहेत श्रीलंका दौऱ्यासाठी पिंपरी चिंचवडचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडची प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

आपण एखादं स्वप्न उराशी बाळगतो आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो, मेहनत घेतो, त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. ऋतुराज नेहमी त्याच्या खेळाबाबत फोकस्ड होता. त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याने त्याच्या सातत्य आणि मेहनतीचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया ऋतुराज गायकवाडचे वडील दशरथ गायकवाड यांनी दिली.
‘आई वडिल या नात्याने आम्ही नेहमीच त्याला सपोर्ट केला ग्रामीण भागातील असल्याने याबाबत आम्हाला फारशी माहिती नव्हती पण, ऋतुराज नेहमी त्याच्या खेळाबाबत फोकस्ड होता वेळच्या वेळी सराव, सातत्य आणि मेहनत यामुळे तो घडत गेला त्याचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ऋतुराजची जडणघडण झाली, दशरथ गायकवाड म्हणाले थेरगाव येथील वेंगसरकर अॅकॅडमीने ऋतुराजच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली, असे दशरथ गायकवाड यांनी सांगितले
‘ऋतुराज सुरुवातीपासून वेंगसरकर अॅकॅडमीत सराव करत होता. जवळपास बारा वर्षे त्याने याठिकाणी कसून सराव केला त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले फॉरमॅट कोणताही असो प्रत्येक दिवशी तयारीनिशी मैदानावर उतरायचे आहे, अशी त्याची भूमिका असते. अपयशाने खचून जायचं नाही आणि यशानं हरळून जायचं नाही, ‘अशी मानसिकता ऋतुराजने तयार केल्याचे गायकवाड यानी नमूद केले.
ऋतुराज गायकवाडचे वडील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. तर, त्याची आई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ते मुळचे पारगाव मेमाने, सासवड येथील रहिवासी आहेत. पण १९७० पासून पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक झाल्याचे दथरथ गायकवाड यांनी सांगितले अनेकांनी सुरवातीला ऋतुराजचे शिक्षण आणि भवितव्य याबाबत शंका उपस्थित केली. पण, त्याच्या यशाने आज सर्वांना प्रतिउत्तर दिल्याचे गायकवाड अभिमानाने सांगतात.