“भाविक भक्तांच्या जयघोषामुळे दुमदुमला इंद्रायणी नदीचा काठ”
–कार्तिकी वारी निमित्ताने भाविक भक्तांची हजेरी
-अवघ्या दोन वर्षानंतर होणार संजीवनी समाधी सोहळा
आळंदी । लोकवार्ता-
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार! धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी !! धन्य भागीरथी पुण्यभूमी! आणिक हो गंगा त्रिवेणी त्या !!
या चरणाप्रमाणे ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री. ज्ञानोबारायांच्या ७२५व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध ठिकाणांहून पायीवारी करत येत असलेल्या भाविकांच्या दिंड्या तसेच पालख्या प्रदक्षिणा पूर्ण करून आळंदीत स्थिरावत आहेत. भाविकांची दर्शनरांग इंद्रायणीच्या पलीकडील दर्शनबारीत पोहोचली आहे.
तत्पूर्वी पहाटे तीनला माऊलींची नित्यनियमाप्रमाणे पवमान अभिषेक व दूधआरती करण्यात आली. पूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता ‘श्रीं’ना महानैवेद्य दाखविण्यात विनामंडपात ह.भ.प बाबासाहेब महाराज देहूकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

धूपआरतीनंतर वीणा मंडपात ह.भ.प. वासकर महाराज यांचे कीर्तन झाले.त्यानंतर रात्री दहानंतर जागरणाचा कार्यक्रम झाला.मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले . कोविड नियमांचे पालन करत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा हा आनंददायी सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी वारकरी दिंडी, पालखीसह टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींचा जयघोष करत अलंकापुरीत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे पवित्र इंद्रायणीकाठ भाविकांनी गजबजून निघाला आहे. भजन, कीर्तन,प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रमांमध्ये असून संजीवन सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.