संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील बैलजोडी जुंपण्याचा मान धायरीतील शेडगे कुटुंबीयांकडे
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान.
देहू । लोकवार्ता
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. संस्थानकडे विविध भागातून १५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जावून संस्थान विश्वस्त मंडळाने बैलजोडीची पाहणी केली. त्यानुसार १५ पैकी दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडी निवडल्या. संस्थानने देऊळवाड्यात रविवारी अंतिम दोन बैलजोडीची सर्वानुमते निवड केली. यात शेडगे आणि टिळेकर यांच्या बैलजोडीस मान मिळाला.

ज्ञानेश्वर शेडगे यांनी सांगितले, की गेले २०१६ पासून पालखी सोहळ्यात बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, यासाठी संस्थानकडे अर्ज करत होतो. यावर्षी बैलजोडी जुंपण्याचा मान मिळाला. घरात वारकरी संप्रदाय आहे. तुकोबांची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा होती. ही संधी मिळाल्याने आनंद झाला. हिरा-राजा ही जोडी कर्नाटकमधून खरेदी केली आहे. दहा लाख रुपये किमतीची बैलजोडी आहे.धायरी येथील सागर टिळेकर म्हणाले, ‘‘यंदा संत तुकाराम महाराजांच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, अशी इच्छा होती. संत तुकाराम महाराज संस्थानने सेवा करण्याची संधी दिल्याने आनंद होत आहे.’’