महाधमाका, सेल, ऑफरच्या नादात ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याचा सराफांनी बांधला चंग
-सोन्याची प्युरिटी, कॅरेटमधील घोळ, पावती न देणे यांमधून ग्राहकांची फसवणूक
लोकवार्ता – सण-वार, उत्सवाच्या निमित्ताने भोसरीमध्ये सराफांनी महाधमाका, सेल, ऑफरच्या नादात ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याचा चंगच बांधला आहे. घडणावळ कमी असल्याचे सांगून , सोने खरेदीमागे हमखास भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून महिलांची गर्दी खेचण्यासाठी नानाविध ऑफर दिल्या जात आहेत. मात्र यामुळे सोन्याची प्युरिटी, कॅरेट मधील घोळ, पावती न देणे यांसारखे घोळ होत असल्याचे प्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ऑफरकडे धाव घेताना सतर्कता नक्की बाळगा असे आवाहन ग्राहक मंचाकडून करण्यात येत आहे.
गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या कालखंडामुळे खरेदीचा उत्साह काही प्रमाणात कमी होता मात्र यंदा उत्सवांवरील निर्बंध कमी झाले असून नागरिक घराबाहेर पडत आहे. याचाच फायदा पदरात पाडून घेण्यासाठी सराफा बाजार तरी मागे कसा राहील. भोसरीमधील अनेक ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये सध्या सेल, महाधमाका ऑफर, खरेदीचा सुवर्णस्पर्श अशा आकर्षक टॅग लाईनच्या खाली महिला खरेदीदारांची गर्दी खेचण्याची रस्सीखेच सुरू आहे. तीन ग्रॅम, पाच ग्रॅम, एक तोळा अशा खरेदी मागे आकर्षक भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवत ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याची खेळी सराफांनी खेळली आहे.
अशी होऊ शकते फसवणूक
एखादी पैठणी ,चांदीचा करंडा किंवा लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस देण्याच्या नावाखाली महिला ग्राहकांची नक्कीच फसवणूक होते असा दावा ग्राहक मंचाकडून करण्यात आला आहे. सोने खरेदी मागे घडणावळ नेहमीपेक्षा कमी आकारणे मात्र नंतर 22 कॅरेट सोने दाखवून त्यापेक्षा कमी प्युरिटी असलेले सोने माथी मारणे, वस्तू खरेदी केल्याची पक्की पावती न देणे यासह अनेक बाबतीत ग्राहकाची सर्रास लूट सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सणासुदीच्या काळात अशा बक्षीस योजना येत असतात. नेमक्या काही सोन्याच्या खरेदी मागे एखादी वस्तू दिली जाते.मात्र लकी ड्रॉ योजनेमध्ये नक्कीच ग्राहकांची फसवणूकच केली जाते. हा मागील काही वर्षांचा अभ्यास आहे.लकी ड्रॉ च्या माध्यमातून किती ग्राहकांना नक्की बक्षीस मिळते हा संशोधनाचा विषय आहे.
ऋतुजा टाव्हारे
स्वामीकृपा इंटरप्राईजेस, भोसरी