शंकर जगताप यांनी व्यक्त केली खदखद, जगताप कुटुंबाला फोडण्याचे झाले प्रयत्न…
लोकवार्ता : पिंपरी: जगताप कुटुंबीयांना फोडण्यासाठी परकीयांनी तर प्रयत्न केलेच पण स्वकियांनी देखील तसे प्रयत्न केले. अशी वेळ दुश्मनांच्या कुटुंबीयावरही येऊ नये, अशी खंत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केली. भाजपच्या आमदार अश्विनी जगताप या आमदार झाल्यानंतर आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकर जगताप यांनी ही खंत व्यक्त केली आहे. स्वकियांचे हे दुःख कायम मनात राहील असे देखील शंकर जगताप म्हणाले आहेत. शंकर जगताप यांच्या या वक्तव्याने चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. शंकर जगताप यांचा नेमका रोख कुणाकडे आहे, अशी चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तसेच आपण अश्विनी वहिनींना आमदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याचे त्यांनी संगितले.

या मेळाव्याला शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी अश्विनी जगताप म्हणाल्या की, २०१७ मध्ये मनपामधील १५ वर्ष राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजप प्रथमच सत्तेत आली. त्यावेळी भाजपने १०० नगरसेवक निवडून आणत पिंपरी चिंचवड महापालिकेवर एक हाती सत्ता आणली. त्यामुळे मनपा पुन्हा आपलाच झेंडा फडकवण्याचा निर्धार अश्विनी जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार महेश लांडगे यांनी लक्ष्मण जगताप यांची कमतरता भासू दिली नसल्याचे देखील शंकर जगताप यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.