महिला सक्षमीकरणासाठी सोनाली कुंजीर यांचे काम उल्लेखनिय-उद्योजक शंकर जगताप
-क्रांतीज्योत सामाजिक विकास संस्थेचे चिंचवडमध्ये उद्घाटन
पिंपरी | लोकवार्ता –
देशाच्या जीडीपीमध्ये महिलांचे योगदान वाढले पाहिजे. यासाठी महिलांचे शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी सोनाली कुंजीर या मागील पंधरा वर्षापासून उपेक्षित आणि वंचित समाजातील महिलांचे संघटन करुन काम करीत आहेत. स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेले काम हे उल्लेखनिय आहे असे प्रतिपादन उद्योजक व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले.
सोनाली कुंजीर यांनी स्थापन केलेल्या क्रांतीज्योत सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 3 डिसेंबर) शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड गाव येथे झाले. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सोनाली कुंजीर, उद्योजक किशोर निंबाळकर, माऊली सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तानाजी निंबाळकर, संतोष निंबाळकर, सचिन फंड, नितीन ठाकूर, रुपाली गरुड, राजश्री लांडगे, आदेश नवले, महेश निंबाळकर, संदिप आगरवार आदी उपस्थित होते.

यावेळी शंकर जगताप म्हणाले की, विकसनशील असणा-या भारत देशाला विकसित भारत देश करण्यासाठी महिलांना शेती क्षेत्राबरोबरच उद्योग, व्यवसाय आणि आरोग्य व सेवा क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यातूनच महिला आर्थिक आणि सामाजिक सक्षम होतील. त्या आर्थिक आणि समाजिक सक्षम झाल्या तर कौटूंबिक हिंसाचाराला देखील पायबंद बसेल. महिलांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झाली की, त्यांची क्रयशक्ती वाढेल. त्यांच्या वाढलेल्या क्रयशक्तीमुळे सर्व उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढेल आणि देशाच्या जीडीपीमध्ये लक्षणिय वाढ होईल. यासाठी सरकार पुढाकार घेतच असते, परंतू सोनाली कुंजीर यांच्या सारख्या भगिनींनीही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढे येऊन काम करावे अशीही अपेक्षा शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वागत व प्रास्ताविक करताना सोनाली कुंजीर म्हणाल्या की, क्रांतीज्योत सामाजिक विकास संस्थेमध्ये नवनिर्माण काच पत्रा कष्टकरी संघ, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघ, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक युनियन, घरेलू कामगार संघटना तसेच आधार विकास महिला पतसंस्थांचा सहभाग आहे. या संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार व महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणासाठी विशेष काम केले जाणार आहे. आधार विकास महिला पतसंस्था मार्फत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज योजना व मार्गदर्शन केले जाणार आहे. व्यवसाय प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरु करण्यात येणार आहे असेही कुंजीर यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन अश्विनी गायसमुद्रे, आभार रुपाली गरुड यांनी मानले.