भ्रष्टाचारावर बोलले: भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांना डावलले!
-प्रभाग २६ मधील ‘अटल करंडक’ स्पर्धेच्या जाहिरातीत फोटो गायब
-स्थानिक नगरसेवक असतानाही भाजपा स्थानिक नेत्यांकडून दुजाभाव
पिंपरी | लोकवार्ता-
चिंचवड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग २६ मधील ‘अटल करंडक’ स्पर्धेवरून आगामी महापालिका निवडणुकांच्या आधीच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या स्पर्धेच्या जाहिरातीमधून भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत तुषार कामठे हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि पालिकेत ठेकेदारांकडून होणारी लूट, ठराविक ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून काढण्यात येणाऱ्या निविदा यावरून कामठे यांनी स्वकीयांनासुद्धा धारेवर धरले होते. या बाबतीत वेळोवेळी त्यांनी महापालिका सभागृहातही प्रश्न विचारण्याची धमक दाखवली होती. मात्र, कामठे यांचा स्वपक्षाविरोधातील सूर स्थानिक नेत्यांच्या नाराजीचे कारण बनला आहे.
माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या पुढाकाराने आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभाग निहाय ‘‘अटल करंडक’’ हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. या स्पर्धेची बॅनरबाजीही मोठ्या दिमाखात केली आहे. मात्र, या बॅनरबाजीमध्ये त्याच प्रभागातील विद्यमान नगरसेवक तुषार कामठे यांना स्थान देण्यात आलेले नाही.

आगामी महापालिका निवडणुकीत गट-तटाचे राजकारण होणार आहे. त्यामध्ये कामठे यांनी स्थानिक नेत्यांशी जुळवून न घेतल्यामुळे त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात स्थान दिले जात नाही, अशी चर्चा आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे मध्यंतरी नगरसेवक कामठे यांना कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली होती. पक्षाच्या नियमित बैठका आणि कार्यक्रमाची माहितीही कामठे यांना कळवली जात नाही, असे सांगितले जाते. परिणामी, भाजपा पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या अंतर्गत गटबाजी फटका आगामी महापालिका निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माझा स्पष्टवक्तेपणा रुचला नसेल : नगरसेवक कामठे
नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन मी आंदोलन केले. महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात पक्षाचा विरोध बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला घेरले कदाचित माझा हा स्पष्टवक्तेपणा पक्षाला किंवा स्थानिक वरिष्ठांना आवडला नसेल. भ्रष्टाचार मुक्त कारभार हा भाजपाचा विचार आहे. मग, त्यासंदर्भात बोलले तर अडचण काय? अशी प्रतिक्रिया नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली.
संभाव्य इच्छुकांना जाहिरातीत संधी…
स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड प्रिमियर लिग (सीपीएल) ‘‘अटल करंडक’’ क्रिकेट स्पर्धा होत आहे. प्रभाग २६ मधील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या जाहिरातींमध्ये नगरसेवक संदीप कस्पटे, ममता गायवाड, आरती चोंधे यांच्यासह इच्छुक उमेदवार नितीन इंगवले, गणेश कस्पटे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे संभाव्य इच्छुकांना भाजपाच्या स्पर्धेत संधी देण्यात आली असून, विद्ममान नगरसेवक तुषार कामठे यांना डावलल्याची चर्चा आहे.