नागरिकांचा विरोध असतानाही फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी एसआरए प्रकल्प
९० %नागरिकांना एसआरए प्रकल्प मान्य नसताना देखील फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी हा प्रकल्पाच घाट घातल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
पिंपरी | लोकवार्ता-
दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. एसआरए प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करावा यासाठी दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी महापालिकेवर एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे.
माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, नगरसेविका माई काटे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, नगरसेवक सचिन चिखले, गोपाळ मोरे, विनय शिंदे, दिपक साळवे, रवी कांबळे, मनोज उप्पार, शेखर काटे, सुप्रिया साळवी, वामन कांबळे, सुधिर जम, श्रीमंत शिंदे, तुषार नवले, बंटी मुजावर, कमलेश पिल्ले, शशांक साळवी, पंडित कांबळे, नितिन शिंदे, अजय ठोंबरे, संदिप तोरणे, नवनाथ डांगे, संतोष अडागळे आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, दापोडीतील एसआरए प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत होणार आहे. येथील जवळपास 90 टक्के • नागरीकांचा विरोध असतानाही महापालिका ठेकेदारांना पोसण्यासाठी हा प्रकल्प करीत आहे का ? स्मार्ट सिटीत शहर स्मार्ट झाले का? कोणताही प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार करणे आवश्यक आहे. एखादा प्रकल्प राबविण्यासाठी स्थानिक 50 टक्के नागरिकांचा विरोध असेल. तर, तिथे प्रकल्प राबवू नये असा राज्य शासनाचा निर्णय आहे. दापोडीतील प्रकल्पाला 90 टक्के नागरिकांचा विरोध असतानाही प्रकल्प राबविण्याचा घाट कशासासाठी घातला जात आहे. केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठीच एसआरए प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. मागील पाच वर्षात प्रशासन, कारभा-यांनी ठेकेदाराला पोसण्याचे काम केले.
प्रशासनाने नागरिकांच्या हिताची भूमिका घेऊन हा प्रकल्प रद्द कायमस्वरूपी करावा. यासाठी सोमवारी होणाऱ्या एल्गार महामोर्च्यास या प्रकल्पाशी संबंधित सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे.