१०वी आणि १२वी विद्यार्थ्यांची परीक्षा होणार ऑफलाईन पद्धतीने!
प्रक्रिया सोप्पी करण्यावर भर दिला जाणार.
मुंबई।लोकवार्ता-
दिवाळी सुट्टीनंतर लगेचच शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत घोषणा होणार असून परीक्षा, निकालांबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या मनात असलेला संभ्रम दूर केला जाईल.शालेय शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी, मुख्याध्यापक, मॉडरेटर, संस्थाचालक, शिक्षक परीक्षांशी संबधित मंडळींशी नुकतीच चर्चा केली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संबंधितांनी एकमुखाने नेहमीच्या वार्षिक लेखी परीक्षेनुसारच दहावी-बारावीचे निकाल जाहीर करण्यात यावे, अशी सूचना केली. तसेच नवीन कोणताही परीक्षा पॅटर्न आणून विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याऐवजी ८०-२० यानुसारच निकाल जाहीर करण्यात यावा, असा विचार संबंधितांनी मांडला.

विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यासक्र म पूर्ण होत आल्याची हमी अनेक मुख्याध्यापकांनी या बैठकीत दिली. या शिवाय गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन अनेक शाळांनी अंतर्गत मूल्यांकन सुरू ठेवले आहे. त्यामुळे करोनामुळे लेखी परीक्षा घेता नाहीच आल्या तर त्या आधारे निकाल जाहीर करता येईल, असा विचारही या वेळी पुढे आला.
दहावी- बारावीच्या लेखी परीक्षा नेहमीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२२ दरम्यान घेण्याच्या दृष्टीनेही मंडळाने चाचपणी सुरू केली आहे.
तिसऱ्या लाटेची अद्याप तरी शक्यता दिसत नाही. त्यामुळे संबंधितांनी केलेल्या सूचनांनुसारच राज्य शिक्षण मंडळ यंदा परीक्षांचे नियोजन करेल. – विशाल सोलंकी, शालेय शिक्षण आयुक्त.