बाजार सुरू करा अन्यथा पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडू
बाजार बंद असल्याने मेंढपाळांची आवक जावक पूर्णतः बंद झाली

लोकवार्ता । प्रतिनिधी
टाळेबंदी, संचारबंदी आणि त्यानंतर व्यापार सुरू करण्याची घोषणा करून देखील केवळ बाजार चालू नसल्याने मेंढपाळांची कोकरं व्यापारी लोक कवडीमोल भावानं खरेदी करत आहेत. सरकारला मेंढपाळांची पिळवणूक दिसणार नाही काय? असा सवाल मेंढपाळ आर्मीचे महासचिव नवनाथ गारळे गारळे यांनी यावेळी उपस्थित केला.
मागील कित्येक महिन्यांपासून शेळ्यामेंढ्याचे बाजार बंद आहेत. राज्यसरकारने तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून बाजार सुरू करावेत, अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडू, असा इशारा नवनाथ गारळे यांनी दिला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून मेंढपाळ आर्मी शेळ्यामेंढ्यांचे बाजार सुरू करा, अशी मागणी करत आहे. तरीदेखील सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. मेंढपाळांच्या बाबतीत सरकार आंधळे झाले असून त्यांना मेंढपाळांची पिळवणूक दिसत नाही, असे मतही नवनाथ गारळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातला मेंढपाळ शांत आहेत. याचा चुकीचा अर्थ काढू नये. सध्या मेंढपाळ वेगवेगळ्या अनेकानेक समस्यांना तोंड देत आहेत. बाजार बंद असल्याने मेंढपाळांची आवक जावक पूर्णतः बंद झाली आहे. मेंढपाळांची कोकरं पावसाळ्यात चढ्या भावाने विकली जातात. परंतु बाजार बंद असल्याने त्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहेत. येत्या काळात बाजार सुरू नाही झाले तर मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात यांच्या नेतृत्वात राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मेंढरं सोडू, असा इशाराही गारळे यांनी बोलताना दिला.
महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यापाठपाठ कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट मुळे देखील राज्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस कोरोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.