गर्दी असणारी दारुची दकाने सुरु; मग मंदिरेच का बंद?
असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी
जेवढी गर्दी बार, दारू दुकानांमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे. राज्य सरकारने भक्तांसाठी व अर्थकारण सुरू राहण्यासाठी मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, आम्हा हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत. आम्हाला कुठेही देव भेटतो. मंदिरे केवळ धार्मिक कारणासाठी उघडी ठेवा. असे आम्ही म्हणत नाही, तर अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे.
हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. मंदिरांवर फार मोठे अवलंबून आहे. मंदिरांवर फार मोठे अर्थकारण अवलंबून असते. अर्थकारण सुरळीत होण्यासाठी म्हणून मंदिरे उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारूची दकाने उघडी ठेवता. मात्र मंदिरे बंद ठेवता, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. शाळांबाबतही राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. शाळेबाबत धरसोड धोरण न ठेवता एक निश्चित धोरण राबविल्यास पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत. असे ते म्हणाले.
गणपतराव देशमुख यांचे स्मारक व्हावे
माजी आ. गणपतराव ऊर्फ आबासाहेब देशमुख यांच्यासारखी माणसे ही पक्षविरहित आहेत. आबासाहेबांची विधिमंडळातील भाषणे ऐकून आमच्यासारख्या अनेकांना महाराष्ट्राचे प्रश्न समजले आहेत. अशा महान, तत्त्वनिष्ठ व्यक्तीचा विधिमंडळाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभा करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगोला येथे केली. गणपतराव देशमुख यांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंगळवारी ते सांगोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.