सायबर क्राईमच्या वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा !
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : माहिती तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून नागरिकांच्या कमाईवर ऑनलाईन डल्ला मारण्याचे प्रकार महाराष्ट्रात सध्या वाढत आहेत. सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे, ही बाब चिंताजनक आहे. याबाबत गृह मंत्रालयाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, २०२० मध्ये राज्यात तब्बल ५ हजार ४९६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असून, गेल्यावर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल झाले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये २०२० मध्ये १०ह जार ७४१ गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्राखालोखाल तेलंगणामध्ये ५ हजार २४ तसेच उत्तर-पूर्वेकडील आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार ५३० गुन्हे सायबर क्राईमसंबंधी दाखल आहेत.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२० मध्ये सायबर क्राईमचा ग्राफ वधारल्याचे दिसते. गेल्यावर्षी सायबर क्राईमचे ५० हजार ३५ गुन्हे दाखल केले. यातील ३० हजार १४२ गुन्हे (६०.२टक्के) फसवणुकीसंबंधी नोंदवले. २०१९ मध्ये सायबर क्राईमच्या ४४ हजार ७३५, तर २०१८ मध्ये २७ हजार २४८ गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, कर्नाटकमध्ये २०२० मध्ये १० २०२० मध्ये वेब मीडियावर खोट्या बातम्यांसंबंधी ५७८ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये देशातील कानाकोपऱ्यांमधून नोकरी- व्यावसायाकरिता वास्तव्य करतात. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी सायबर क्राईमद्वारे ऑनलाईन पैशाची फसवणूक सारखे प्रकार वाढले आहेत. याबाबत राज्याच्या गृहविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.