पाणीपूरवठा कट करण्याची चुकीची मोहीम बंद करा, नाहीतर मनपासमोर आंदोलन; चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटीचे आवाहन
लोकवार्ता : पिंपरी चिंचवड मनपाच्या करसंकलन विभागाकडून सद्या थकीत कर वसुलीसाठी मोहीम चालू आहे. या मोहिमेअंतर्गत करसंकलन विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर थकविल्याने पूर्ण सोसायटीचा पाणीपूरवठा कट केला जात आहे.

ही अतिशय चुकीची आणि बेकायदेशीर बाब आहे. सोसायट्यांमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर भरला नसल्यामुळे पूर्ण सोसायटीचा पाणीपूरवठा कट करणे म्हणजे सोसायट्यांमधील ज्या नागरिकांनी नियमाने मालमत्ताकर भरला आहे त्यांच्यावर अन्याय आहे. अशा प्रकारची चुकीची आणि जुलमी मोहीम राबवू नये असे आवाहन चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
असे केल्यास पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून आपल्या करसंकलन विभागास आणि पिंपरी चिंचवड मनपास सहकार्य केले जाणार नाही असंही सांगण्यात आलं आहे. तसेच जर ही चुकीची आणि अन्यायकारक मोहीम आपण चालू ठेवली, तर ज्या सोसायटीधारकांनी पूर्ण मालमत्ताकर भरलेला आहे त्यांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड मनपासमोर खूप मोठे आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ज्या सदस्यांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांच्या मालमत्ता जप्त करा अथवा इतर कायदेशीर कारवाई करा यासाठी आपले फेडरेशन पिंपरी चिंचवड मनपास सहकार्य करेल, परंतु चुकीच्या मार्गाने सर्व सोसायटीचा पाणीपुरवठा बंद केला तर याला आमचा प्रखर विरोध राहील, असे आवाहन चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.