रेस्टॉरंट चालकांनी खाद्यपदार्थाच्या बिलात सर्व्हिस चार्ज आकारल्यास करण्यात येणार कडक कारवाई
लोकवार्ता : हॉटेल तसेच रेस्टॉरंट चालकांनी खाद्यपदार्थाच्या बिलात सर्व्हिस चार्ज आकारू नये, असे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी जारी केले आहेत.
टिप म्हणून वा सेवेवर खूश होऊन ग्राहकाने स्वत:हून काही पैसे दिल्यास ती बाब सर्वस्वी वेगळी आहे. पण हॉटेल वा रेस्टॉरंटचालक इथून पुढे ग्राहकांवर सर्व्हिस चार्जची सक्ती करू शकणार नाहीत. सर्व्हिस चार्जवर बंदी घालण्यात आली आहे म्हणून हे पैसे अन्य कुठल्यातरी नावाने ग्राहकांकडून वसूल करण्याची शक्कल हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी लढवू नये, अशी टिपणीही या आदेशात करण्यात आली आहे.

जर सर्व्हिस चार्जची आकारणी हॉटेल, इरेस्टॉरंट मालकाने केल्यास ग्राहक त्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेलपलाईन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदव शकतील, यापूर्वी 2017 मध्ये याबाबतची नियमावली ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केली होती. त्यात बिलामध्ये सर्व्हिस चार्जचा रकाना छापण्याची मुभा देण्यात आली होती; पण ती या रकान्यात ग्राहकाने स्वखुशीने रक्कम भरण्यासाठी म्हणून देण्यात आली होती. हॉटेल वा रेस्टॉरंटचालकाने स्वत: ही रक्कम ठरविण्यासाठी नव्हे, असेही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी इथून पुढे बिलात सर्व्हिस चार्ज आकारल्यास ग्राहक संरक्षण कायद्यासह संशोधित कायदा 2019 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे.