छटपुजेत अडथळा आणून धार्मिक भावना दुखावणाऱ्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करा
चौकशी समिती नेमूण सात दिवसात कारवाईची विश्व श्रीराम सेनेची मागणी
पिंपरी| लोकवार्ता-
मागील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार या कालावधीत उत्तर भारतीय नागरीकांनी देशभर छटपुजा महोत्सव मोठ्या उत्साहात भक्ती भावाने साजरा केला. परंतू पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या सहकारी असणारे अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी तसेच पोलिस प्रशासन यांचा एकमेकांशी योग्य समन्वय नसल्यामुळे सहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे यांनी दबंगगिरी करीत मोशी येथिल इंद्रायणी घाटावर होणा-या छठपुजेत जाणून बुजून व्यत्यय आणून भक्त भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करीत छटपुजेतील व्यत्यय आणणा-या सहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे आणि संबंधित अधिका-यांची या घटनेबाबत चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सोमवारी लेखी पत्र देऊन केली आहे.
आयुक्त पाटील यांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, शहरातील सतरा घाटांवर छटपुजा उत्सव साजरा करण्यासाठी विश्व श्रीराम सेनेने परवानगी मागितली होती. आयुक्त पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय आणि उपायुक्त संदिप खोत यांची समिती नेमूण छटपूजा उत्सवासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा देण्याचे आदेश दिले. मात्र आयुक्त पाटील यांचे आदेश धाब्यावर बसवून या अधिका-यांनी सहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे यांच्यावर जबाबदारी ढकलून कर्तव्यात कसूर केली. सहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे यांनी छटपूजा महोत्सवाच्या मुख्य पूजेच्या दिवशी बुधवारी (दि. 10 नोव्हेंबर) मोशी येथिल इंद्रायणी घाटावर येऊन छटपूजेत सहभागी होणा-या उत्तर भारतीय बंधू – भगिनींना रोखले. पोलिस बळाचा वापर करुन येणा-या भाविकांना अपमानीत करुन पुन्हा घरी हाकलले.

यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी छटपूजेसाठी परवानगी दिली असल्याचे आयोजक विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक लालबाबू गुप्ता आणि त्यांच्या सहका-यांनी बोदाडे यांना सांगितले. त्यानंतरही बोदाडे यांनी स्वता:च्या हस्ताक्षरात छटपुजेस परवानगी नसल्याचे पत्र आयोजकांना दिले. जर आयुक्तांनी परवानगी दिली असताना पुजेच्या दोन तास अगोदर ऐनवेळी इंद्रायणी घाटावर येऊन पोलिस बळाचा वापर करुन दबंगगिरी करीत भाविकांच्या भावना दुखवण्याचे काम सहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे यांनी का केले ? असा प्रश्न निर्माण होतो. आयुक्त मोठे की सहाय्यक आयुक्त पदाने मोठे ? पुन्हा याच सहाय्यक आयुक्त बोदाडे यांनी त्यांच्याच कार्यक्षेत्रात इतर घाटांवर (उदाहरणार्थ भोसरी येथिल तळ्यावर) त्याचवेळी हजारो भाविक एकत्र येऊन छटपुजा उत्सव साजरा करतात याकडे दुर्लक्ष का केले ? तसेच शहरातील इतर घाटांवर देखिल छटपुजा उत्सव सुरु असताना फक्त विश्व श्रीराम सेनेच्या वतीने सुरु असणा-या इंद्रायणी घाटावरील उत्सवात अडथळा आणण्यामागे आण्णा बोदाडे यांचा काय हेतू होता असाही प्रश्न उपस्थित होत
हा सर्व घटनाक्रम विश्व श्रीराम सेनेच्या पदाधिका-यांनी आयुक्त राजेश पाटील यांना लेखी कळविला असून या विषयी चौकशी समिती नेमूण दोषींवर कडक कारवाई करावी अशीही मागणी लालबाबू गुप्ता यांनी केली आहे.