कुदळवाडीमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करा – दिनेश यादव
– महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना निवेदन
पिंपरी।लोकवार्ता-
कुदळवाडी ते जाधववाडी रस्त्यावर पाण्याच्या कनेक्शनचा लोखंडी पाइप फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु, या गोष्टीकडे संबंधित मालक अथवा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.याबाबत तातडीने उपाय योजना करण्यात याव्या व पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळावा, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्यदिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुदळवाडी ते जाधववाडी हा कुदळवाडीमधील हा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर महापालिकेच्या पाणीपुरवठा पाइपलाइनला कनेक्शन असलेला पाइप रस्त्यावर उघडा असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे फुटला आहे. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. या रहदारीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडत होते. त्यामुळे वाहनचालक व नागरिक यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी येथे येऊन गळती पाहून देखील पाइपलाइन दुरुस्त न करता निघून गेले. त्यामुळे येथील पाइपलाइन भूमिगत करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणीही दिनेश यादव यांनी केली आहे.