महापालिका निवडणुका लांबणीवर जाण्याची चर्चा; इच्छुकांचा जीव टांगणीला
लोकवार्ता : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले. मात्र, महापालिका निवडणूक जाहीर होत नसल्याने राजकीय पक्ष आणि इच्छुकांचा तसेच माजी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे. निवडणूक डिसेंबर कि फेब्रुवारीमध्ये होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचवेळी नगरसेवक पदासाठी इच्छुकांचा कार्यक्रम आणि उपक्रमावरील खर्चाने दमछाक सुरू आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेची मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली. त्यांचा कालखंड मार्च २०२२मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेला स्थगिती आहे. त्यामुळे ही स्थगिती उठविण्यात येणार की नवीन प्रभाग रचना होणार, याविषयी अनिश्चितताआहे. त्यामुळे इच्छुकांची दमछाक होत आहे.
आरक्षण बदलण्याची आशा…
ओबीसी आणि मराठा आरक्षण तसेच प्रभाग रचना मुद्द्यावरून न्यायालयात दावे दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया लांबली आहे. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महिन्यात निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, निवडणूक प्रकिया आणखी लांबली आहे. भाजपा सरकारने महाविकास आघाडीच्या कालखंडातील प्रभाग रचना रद्द केली. २०१७ प्रमाणेच निवडणूक घेण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेनंतर आरक्षण बदलण्याची आशा आहे.
इच्छुक झाले थंड
महापालिका निवडणूक कधी होईल, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे अनेकांनी हात आखडता घेत फक्त मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रभागामधील हक्काच्या पॉकेट्समधील नागरिकांना शुभेच्छा देऊन मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला, तसेच तीन प्रभागांनुसार काहींनी सुरु केलेला प्रचार थांबविला आहे. इच्छुक निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
सोशल मीडियाही थंडावला
निवडणुकीची चिन्हे नसल्याने इच्छुक उमेदवारांचे सण, उत्सवात सोशल मीडिया वॉर सुरू असायचे. त्यात विविध उपक्रमांच्या पोस्ट, शुभेच्छा तसेच कार्यक्रमांचे फोटो, माहिती टाकण्यासाठी चढाऔढ असायची. व्हॉटसअप आणि फेसबुक, इन्स्ट्राग्रामवर स्पर्धा असायची. मात्र, आता ही स्पर्धा थंडावली आहे. इच्छुकांप्रमाणेच सोशल मीडियाही गारठला आहे. तसेच यंदाच्या दिवाळीत मतदारांच्या घरी येणारी शुभेच्छापत्रे आणि फराळाची पाकिटे येणेही थंडावले.