राणेंविषयी विचारताच ठाकरेंची फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया !
ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं.

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : सध्या राज्यात नारायण राणेंची जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या जागेचं शुद्धिकरण करून घेतलं. हाच मुद्दा सध्या गाजत आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी नुसतं नारायण राणे हे नाव उच्चारताच दिलेली प्रतिक्रिया मात्र काहीशी वेगळीच होती.
राज ठाकरेंची पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी केवळ नारायण राणे एवढं बोलताच राज ठाकरे यांनी त्याला मध्येच तोडत “ए चल बस्स…” अशी प्रतिक्रिया दिली आणि ते पत्रकार परिषदेतून निघून गेले. आता त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल मात्र चांगलीच चर्चा होत असून त्यातून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला होता. “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला शरद पवार यांनी विचारला होता. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
तसेच, यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर टीका केली. त्यामुळे आता जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं.