लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

येत्या शुक्रवारपासून रंगणार चोविसावा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव

पं. राम देशपांडे यांचे गायन आणि राहुल शर्मा यांचे संतूरवादन
पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित चोविसावा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव येत्या शुक्रवारी म्हणजे 11 मार्च रोजी सुरु होत असून यंदा महोत्सव तीन दिवस रंगणार आहे. राहुल शर्मा यांचे संतूरवादन, पं. राम देशपांडे यांचे गायन, आम्ही दुनियेचे राजे हा वेगळा संगीतमय नाट्यानुभव आणि युवा कलाकारांचे गायन हे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगणा-या या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी(11 मार्च) सायंकाळी होणार आहे. यावेळी स्वरसागर पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व शिष्य राहुल शर्मा यांचे संतूरवादन होईल. महोत्सवात दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी(12 मार्च) सकाळच्या सत्रात स्थानिक उदयोन्मुख कलाकारांच्या गायन, वादनाची स्पर्धा होईल.

त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात ‘आम्ही दुनियेचे राजे’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात येईल. संगीत आणि नाट्य यांच्या आविष्कारातून दिग्गज संगीत दिग्दर्शकांची गाणी यात सादर होतात. मराठी चित्रपट संगीताच्या पहिल्या पाच दशकांना मा. कृष्णराव, पु. ल. देशपांडे. श्रीनिवास खळे, सुधीर फडके आणि वसंत प्रभू यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांच्या प्रतिभेमुळे मराठी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. याच सुवर्णकाळाचा वेध घेणारा संगीत नाट्यानुभव म्हणजे ‘आम्ही दुनियेचे राजे’. यात आजच्या पिढीला साद घालत सुवर्णकाळ जागवणारी गाण्यांची रचना आहे. या कार्यक्रमाचे लेखन दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांचे असून त्यांनी व केतन पवार यांनी संवाद लिहिले आहेत. अभिजित खांडकेकर, गौतमी देशपांडे, जयदीप वैद्य, आशुतोष मुंगळे, राजेश्वरी पवार, मुक्ता जोशी हे कलावंत कार्यक्रम सादर करणार आहेत.  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि तिला राजमान्यता मिळावी यासाठी सध्या मोठी चळवळ सुरू आहे. याच्या समर्थनार्थ या कार्यक्रमाचा विशेष अंतर्भाव केला आहे.

रविवारी(13 मार्च) सकाळच्या सत्रात स्थानिक कलाकारांसाठी भारतीय शास्त्रीय नृत्याची स्पर्धा होणार आहे. त्यानंतर होणा-या संध्याकाळच्या सत्रात पं. सुधाकर चव्हाण यांच्या कन्या व शिष्या शाश्वती चव्हाण यांचे गायन होईल. तसेच स्वीकार कट्टी यांचे सतारवादन होईल. शुक्रवारी झालेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण होईल. पुढील सत्रात मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांचे सहगायन होईल. या स्वरसागर महोत्सवाचा समारोप पं. राम देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रीय गायन, तबला सोलो वादन आणि शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च ही असून सायंकाळी सात वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.  या स्पर्धेसाठी वय वर्षे 10 ते 18 आणि 18 ते 35 असे दोन गट आहेत. शास्त्रीय गायन व तबला वादन स्पर्धा शनिवारी (12 मार्च) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होईल. तसेच शास्त्रीय नृत्य स्पर्धा रविवारी(13 मार्च) रोजी प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होईल. यासाठी स्पर्धकांनी आपले साथीदार व वाद्ये सोबत आणावीत. तसेच गायन व वादनासाठी सात ते दहा मिनिटांचा कालावधी असेल. शास्त्रीय नृत्य स्पर्धेचा कालावधी पाच ते सात मिनिटे राहिल. स्पर्धेतील प्रत्येक गटातील तीन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येईल. प्रथम पारितोषिक रुपये 5000, द्वितीय पारितोषिक रुपये 3000 व तृतीय पारितोषिक रुपये 2000 रोख असे असणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3tBfqyv या लिंकवर क्लिक करा तसेच या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी नंदकिशोर ढोरे यांना 9762574015 यांना या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे आहेत. संजय कांबळे, प्रशांत पाटील, सतीश इंगळे, मलप्पा कस्तुरे, पुरुषोत्तम डबीर, जवाहर कोटवानी, मोहन लोंढे, गजानन चिंचवडे, अस्मिता सावंत, तानाजी ठिगळे, शिरीष कुंभार, मनोज ढेरंगे हे सर्व सदस्य आहेत. तसेच युवा कार्यकारिणीचे प्रमुख शरयूनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत तुपे असून शंतनु देशमुख, जुई तुपे, संजना देशमुख, केतकी आवटे, सुकोमल चिंचवडे, गौरी भोसकर, संस्कृती लिखितकर, उन्नती इनामदार, तृप्ती गायकवाड, अमृता राऊत हे सर्व सदस्य आहेत. सांस्कृतिक समितीचा कार्यभार स्मिता देशमुख, सुधाकर चव्हाण, तेजश्री अडिगे, नंदकिशोर ढेरे, सुरेखा कुलकर्णी हे सांभाळत आहेत.  हा सर्व कार्यक्रम विनामूल्य असून काही जागा राखीव आहेत.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani