गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सर्वात मोठा पराभव
-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नोटा पेक्षाही कमी मते.
मुंबई | लोकवार्ता-
पाच राज्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निवडणूक लढवण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव झालेला दिसून आले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.

निकालानंतर आशिष शेलार यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोमणा
या निकालानंतर भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टोमणे मारले जात आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, इसवी सन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार आहे. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा… सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील, असं ते म्हणाले. शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात.. “आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ!” असं शेलारांनी म्हटलं आहे.