केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष
-श्रीरंग बारणे संसदेत गरजले.
पिंपरी | लोकवार्ता-
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. प्राचीन परंपरा असलेली मराठी भाषा, अनेकांची बोली भाषा असलेल्या मराठी भाषेचा 2220 वर्षापूर्वींचा सिलाण्यास देखील आहे. असे असतानाही आजपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केला. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा त्यांनी यावेळी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना खासदार बारणे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सभागृहाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले. खासदार बारणे म्हणाले, मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासूनचे मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू इत्यादी देखील भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. भारतातील भाषांपैकी मराठी भाषा एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र, गोव्याची अधिकृत भाषा मराठी आहे. मराठी भाषा बोलणा-यांची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. इ.स.वी सन 900 पासून ही भाषा प्रचलित आहे. हिंदीच्या समान संस्कृतवर आधारित मराठी भाषा आहे. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते.

हजारो वर्षापूर्वीची परंपरा राहिलेली मराठी भाषा, मराठी वाड:मय साहित्यांचे लेखन संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराज, वी.स.खांडेकर, विंदा कंरदीकर, पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, मंगेश पाडगावकर याबरोबर अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेत साहित्य लिहिले आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!, धर्म, पंत, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी! बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जानतो मराठी, मानतो मराठी!!
ज्ञानेश्वरीत मराठीचा उल्लेख अतिशय सुंदर केला आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळवीन’ हजार वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. त्याबाबत आपण केंद्र सरकारला सूचना करावी अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.