ज्यांना बोट धरून बाळासाहेबांनी मोठे केले, त्यांच्याच मुलाला त्रास दिला जातोय; पटोलेंनी भाजपाला सुनावलं
शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुन्हा एकदा काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. सत्तेत राहणार पण स्वबळावर लढणार, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपलाही फटकारले. बाळासाहेब ठाकरे यांनी बोट धरून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात वर आणले आणि त्यांचाच मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांची खुर्ची काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे निषेधार्थ आहे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली आहे. पत्रकारांनी सरनाईक यांच्या पत्राविषयी प्रश्न विचारला असता भाजपा केंद्र तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्रास देत असल्याचे आपण पाहत असल्याचे म्हटले.
“केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावरून विरोधकांवर दबाव आणण्याचं काम भाजप करत आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झालं आहे,” असे पटोले यांनी स्पष्ट केले.
सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर रविवारी नाना पटोले यांनी हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हटले होते. त्यानंतर सोमवारी पटोले यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याबाबत भाष्य केलं आहे. “राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, परंतु सत्ता नसल्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा डाव सुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,” पटोले यांनी यावेळी सांगितले.