देशाला नेता हवा आहे, इव्हेंट मॅनेजर नको
अनुदान आयोगाच्या निर्देशावरून विद्यापीठांमध्ये झळकलेल्या पोस्टर्सवरून वाद

लोकवार्ता । प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकारकडून प्रसिद्धीसाठी देशातील शिक्षण संस्थांचा गैरवापर होत आहे. मोफत लसींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारी पोस्टर्स देशातील विद्यापीठांमध्ये झळकली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशावरून ही पोस्टर्स लावण्यात येत आहेत. त्यावरून काँग्रेसने ट्विटरवरून टीका केली असून ‘देशाला नेता हवा आहे, इव्हेंट मॅनेजर नको ‘ असे म्हटले आहे.

काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅण्डलवर लसीकरण मोहिमेबद्दल मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केली आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना एका दिवसात पोलिओ लसीचे १७ कोटी डोस देण्यात आले होते. मात्र त्यांनी कधीही त्याचा गाजावाजा किंवा इव्हेंटबाजी केली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. दोघांचे फोटोही शेअर करून ‘देशाला नेता हवा आहे, इव्हेंट मॅनेजर नको’, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.
मोफत लसीकरणाच्या मोहिमेबद्दल पंतप्रधानांचे आभार माना, असे निर्देश ‘यूजीसी’चे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी देशातील विद्यापीठांना दिले आहेत. अनेक विद्यापीठांनी त्याचे पालन करून आपल्या आवारातच नव्हे तर वेबसाईटवरही पंतप्रधानांचे आभार मानायला सुरुवात केली आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. राजकीय पक्षांनी या पोस्टरबाजीवरून मोदींवर निशाणा साधला आहे . देशातील नागरिकांना मोफत लस पुरवणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. त्याची प्रसिद्धी करणे गैर आहे असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.