“पिंपरीत मालमत्ताधारक करतायत असा ‘बनावट’ पणा”
-मिळकत धारकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या करसंकलन विभागाने घेतला आहे.
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहरात एकूण साडेपाच लाख मालमत्ता आहेत. या मिळकतींच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीमध्ये वर्षाला नऊशे ते एक हजार कोटी रुपयांची रक्कम जमा होते. महानगरपालिकेला करापोटी मिळणारी रक्कम एक मोठे उत्पन्नाचे साधन आहे. यंदाही कराच्या वसुलीसाठी महानगरपालिकेनं मोठे मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना नोटीस दिल्या असून जप्तीच्या कारवाईला सुरूवात केली आहे. महापालिकेत एक लाखापेक्षा जास्त मालमत्ताकर असलेल्यामध्ये 27 हजार 714 मोठ्या थकबाकीधारकांचा समावेश आहे. यात औद्योगिकसह निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा समावेश आहे. महापालिका करसंकलन विभागाने सुमारे 13 हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

करसंकलन विभागाकडील आकडेवारीनुसार एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 27 हजार 714 इतकी आहे. त्यामध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मालमत्ताकर थकबाकीदारांची संख्या 20 हजार 561 इतकी आहे. त्यामध्ये निवासी मालमत्ताधारक 10 हजार 600, औद्योगिक 6 हजार 618 आणि मिश्र 3 हजार 343 थकबाकीदारांचा समावेश आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 4 हजार 153 इतकी आहे. त्यामध्ये निवासी 1 हजार 279, बिगरनिवासी 1 हजार 612, मिश्र 929 मालमत्ताधारक आहेत.