जाणून घ्या ! भंगारवाला ते थेट कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतची वाटचाल
नवाब मलिक यांचा काँग्रेस ते राष्ट्रवादी व्हाया समाजवादी पक्ष असा प्रवास!
पिंपरी।लोकवार्ता-
राज्यात सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचं नाव चांगलच चर्चेत आहे. एनसीबीनं २ ऑगस्टला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली आणि तेव्हापासून नवाब मलिक महाराष्ट्रात चर्चेत आले. मलिक यांनी सातत्याने एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लागोपाठ टीकास्त्र सोडले. यादरम्यान, नवाब मलिक यांच्यावर भाजपाकडून देखील निशाणा साधण्यात आला आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमध्ये नवाब मलिकांचा उल्लेख भंगारवाला असा देखील करण्यात आला. त्यावर “भंगारवाला असल्याचा अभिमान आहे” असा प्रतिटोलाही नवाब मलिक यांनी भाजपाला लगावला.

कसे झाले नवाब मलिक एका भंगारवाल्यापासून थेट कॅबिनेट मंत्री?
नवाब मलिक मूळचे उत्तर प्रदेशचे! कामानिमित्त मलिक कुटुंब मुंबईच्या डोंगरी भागात स्थायिक झालं. बुऱ्हाणी कॉलेजमध्ये असताना फीवाढीविरोधात आंदोलन केलं आणि त्यांच्या राजकीय प्रवेशाची सुरुवात झाली. १९८४ साली वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली. गुरुदास कामत यांनी ही निवडणूक ९५ हजार मतांनी जिंकली. नवाब मलिक पराभूत झाले.पण २६२० मतांनी पराभूत झालेले नवाब मलिक पुढे काँग्रेसमध्येच सक्रिय झाले. १९९१ मध्ये काँग्रेसनं महानगरपालिकेचं तिकीट नाकारल्यानंतर काही वर्षांनी ते समाजवादी पक्षात गेले. १९९५ साली कुर्ल्याच्या नेहरू नगर मतदारसंघात शिवसेनेच्या सूर्यकांत महाडिकांनी त्यांचा पराभव केला. पण पुढच्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत ते जिंकले आणि विधानसभेत गेले. ९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारसोबतच्या आघाडीत नवाब मलिक यांच्या वाट्याला गृहनिर्माण राज्यमंत्रीपद आलं.