लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सोमय्यांच्या आरोपांमागे शिवसेनेच्याच मोठ्या माजी मंत्र्याची रसद

वादाचा त्रास आमच्या पर्यटन व्यावसायिकांना होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही

लोकवार्ता । प्रतिनिधी

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्टीसाठी कदम आणि सोमय्या यांच्यातील दूरभाष संवादाची ध्वनिफीतही ऐकवली.

अनिल परब यांचे बांद्रा येथील कार्यालय तोडले जावे म्हणून त्यांनी केलेला आटापिटाही या ध्वनिफितीत ऐकायला मिळतो. माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांचाही या ध्वनिफितीत सहभाग असून अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून मला मंत्रिमंडळात घेण्यापासून रोखले आहे, असे कदम यांचे प्रसाद कर्वे यांच्यासोबतचे कथित संभाषण या वेळी ऐकवण्यात आले.

दापोली तालुक्यातील मुरुड येथे परब यांनी केलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा सोमय्या यांनी यापूर्वीच केला असून ते तोडण्यासाठी कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करत आहेत. पुरावा म्हणून मोबाइलवरील संभाषणाच्या एकूण दहा ध्ननिफिती पत्रकार परिषदेत सादर करत, आमच्या महाविकास आघाडीत काही सूर्याजी पिसाळ तयार झालेत, असाही आरोप संजय कदम यांनी केला.

आमची भूमिका कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या बाजूने आहे. रामदास कदम व पालकमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद असतील आणि त्या वादाचा त्रास आमच्या पर्यटन व्यावसायिकांना होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही.

माहितीच्या अधिकाराचा वापर करून प्रसाद कर्वे बाकीच्या गोष्टी करत असेल व रामदास कदम त्याचा उपयोग यासाठी करत असतील तर तो कर्वे त्यांनाही भविष्यात महागात पडेल. कदम यांच्याशी झालेला कॉल रेकॉर्ड करण्यामागील अर्थ स्पष्ट आहे. आम्ही हे सर्व पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत, असेही कदम यांनी सांगितले.

माझ्याविरुद्ध कारस्थान -रामदास कदम
माझ्या मंत्रिपदाच्या काळात कोकणातील पर्यटन उद्योग वाढावा यासाठी सीआरझेडमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला होता. दापोली तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीत स्थानिकांना पर्यटनाद्वारे रोजगार मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. मंत्री अनिल परब यांच्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत बोलणे उचित नाही. पण येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, असा खुलासा रामदास कदम यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani