दोन महिन्यांनंतर काल दिवसभरात सर्वात कमी रुग्णांची नोंद
कोरोनाची दुसरी भयावह लाट ओसरताना दिसत आहे

लोकवार्ता।प्रतिनिधी
फेब्रुवारी महिन्यात डोकं वर काढलेल्या कोरोनाची दुसरी भयावह लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी मोठा दिलासा देणारी आहे. देशात तब्बल दोन महिन्यांनंतर काल दिवसभरात सर्वात कमी करोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून चिंतेत भर टाकणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत एक लाख १४ हजार ४६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एक लाख ८९ हजार २३२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. याच कालावधीत देशात दोन हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ रुग्ण उपचाराधीन असून, करोना बळींची एकूण संख्या तीन लाख ४६ हजार ७५९ वर पोहोचली आहे.