पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली
म्हशींच्या संख्येतही वाढ

लोकवार्ता।प्रतिनिधी
पाकिस्तानात दरवर्षी गाढवांच्या संख्येत एक लाखाची वाढ होत असल्याचं २०२१च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या माहितीवरुन समोर आलं आहे. तर म्हशींच्या संख्येतही १० लाखांहून अधिक वाढ झाली असून मेढ्यांची संख्याही ३१.२ मिलियनवरुन ३१.५ मिलियनवर पोहोचली आहे. पंजाबच्या पशुधन विभागाने पाकिस्तानातल्या प्राण्यांच्या संख्येत होणारी वाढ समोर आणली आहे.

यंदाच्या वर्षी या देशात ५० लाख गाढवांची संख्या नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान हा गाढवांची सर्वाधिक संख्या असलेला जगातला तिसरा देश ठरला आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्ही या वाहिनीने हे सर्वेक्षण केले आहे.
राज्याने प्राण्यांच्या मोफत उपचारासाठी रुग्णालयंही उभारली आहेत मात्र प्राण्यांच्या संख्येत आता अनियंत्रित वाढ होऊ लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात फक्त लाहोरमधली गाढवांची संख्या ४१ हजाराने वाढली. तर एका वर्षांत मेंढ्यांची संख्या ४ लाखाने वाढली. बकरी तसंच इतरही प्राण्यांच्या संख्येत झालेली अनियंत्रित वाढ या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
समोर आलेल्या आक़डेवारीनुसार, यंदाच्या वर्षी एकूण पशुधनात १.९ मिलियनची वाढ झाली आहे. या प्राण्यांच्या मालकांनी सांगितलं की, हे प्राणी अधिक उत्पन्न मिळवून देतात. बकऱ्यांकडून मिळणाऱ्या दुधापासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन केलं जातं. तर गाढवं ओझी वाहण्याच्या कामी येतात. त्याचबरोबर बांधकामासाठी लागणारं साहित्यही त्यांच्या माध्यमातून वाहून आणता येतं.
एएनआयच्या एका अहवालानुसार ३५ हजार ते ५५ हजार किंमत असलेलं एक गाढव त्याच्या मालकाला दररोज एक हजार रुपयांचं उत्पन्न मिळवून देतं. त्याचबरोबर गाढवांना विकूनही मालकाला चांगला फायदा होतो असं काही जणांचं म्हणणं आहे.