“…त्याची भरपाई पवार कुटुंबाला याच जन्मात करावी लागेल”
पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

लोकवार्ता । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. दरम्यान, मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांच्या एकूण ४० रहिवाशांच्या आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यावर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील भाष्य केले आहे.
याआधी केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती. त्यावर साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार अशी टिका निलेश राणे यांनी केली आहे.
“शरद पवारांनी उलटा नियम लावून शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने उद्योगपतींच्या नावाने केले. शेतकऱ्यांचे कारखाने उद्योगपती आणि पवार कुटुंबियांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे. त्यांच्या उपजिविकेचे साधन काढून घ्यायचे, “असे म्हणत असल्याचा तक्रारदार माणिकराव जाधव यांचा एक व्हिडीओ निलेश राणे यांनी आपल्या ट्विटवरुन पोस्ट केला आहे.
“पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले हे पुरावे सहित यंत्रणांकडे पोहोचलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल, ही तर सुरुवात आहे. साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने इतर कंपन्यांवर छापे टाकले, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या संस्थांवर छापे टाकले, त्याचे वाईट वाटल्याचे पवार यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. “उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्यानंतर मी या प्रकाराची तुलना जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी केली. त्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याने त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली असावी, असे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकणे, हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक आहे,” असे शरद पवार म्हणाले.